प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पत्रकारितेचा “मापदंड” जोपासणाऱ्या पत्रकारांना सॅलूट – मृत्यूकार विनोद अहिरे

0
17

“पत्रकारांच्या ओठावर स्मितहास्य असते;परंतु काळजात मात्र अनेक जखमा आणि वेदना जपत पत्रकार पत्रकारिता करीत असतात.”

होय हे अगदी हे सत्य आहे. आणि तेहीअगदी सूर्यप्रकाशाइतके

आज ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस त्यांनी दर्पणच्या माध्यमातून महाराष्ट्रात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली त्यांची ६ जानेवारी जयंती दिनी महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल “दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर यांसह महात्मा फुले, गो.ग. आगरकर, मेघाजी लोखंडे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

लोकमान्य टिळकांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” अशा प्रकारचे ज्वलजहाल अग्रलेख लिहून ब्रिटिश सत्तेला हादरे दिले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडून सामाजिक दंभावर जोरदार हल्ले चढवूले आणि अस्पृश्यते विरुद्ध रणसिंग फुंकले.

परंतु हे सगळे करीत असताना पत्रकारितेचे असलेले ‘मापदंड’ त्यांनी पायदळी कधीच तुडवले नाही. परंतु आजच्या घडीला ते “मापदंड” कितपत पाडले जातात हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पण असो……. सर्वच पत्रकार पत्रकारितेचे ‘मापदंड’ पायदळी तुडवतात असे नाही! अजूनही नैतिक पत्रकारिता जोपासणारे पत्रकार, संपादक मंडळी आहेच, आणि त्यांच्याच लेखणीच्या जोरावर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ अजूनही दिमाखात उभा आहे. त्या सर्व पत्रकार मंडळींना आम्ही अगदी मनापासून सॅलूट’ करतो.

कालौघात पत्रकारितेचे स्वरूप बदलले लेखणीची जागा कम्प्युटरच्या की-बोर्ड घेतली. एका बातमीला किंवा छायाचित्राला दैनिकाच्या कार्यालयापर्यंत जायला तास किंवा दिवस लागायचा आणि दुसऱ्या दिवशी ती वाचकांपर्यंत पोहचायची पण आता मात्र काही क्षणात डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत जाऊ लागली, अगोदर प्रत्येक पत्रकारांचे आपले वैयक्तिक सोर्स (खबऱ्यांचे जाळं) असायचं आणि त्यानुसार त्यांच्या लेखणीला धार चढायची; परंतु आता मात्र काही सन्मानिय अपवाद सोडले, तर तसे काही राहिले नाही. त्यांची जागा आता टोळी पत्रकारितेने घेतली आहे. म्हणजे बातमीची आपल्या सोर्सच्या माध्यमातून वैयक्तिक चिकित्सा तथा शहानिशा न करता वातानुकूलिन कक्षात बसून चहाचे झुरके मारत गप्पांमध्ये दंग होऊन बातमी डिजिटल पद्धतीने सर्वांनी वाटून घ्यायची आणि कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या मनाचे रंग चढवायचे असंच काहीसं सुरू आहे.

बाळशास्त्री जांभेकरांपासून तर आज पावेतो एक बाब मात्र आहे, तशीच आहे. ती म्हणजे आर्थिक अडचणींची “दर्पण” सुरू झाले तेव्हा सुरुवातीच्या काळात तर, वर्गणीदारच मिळाले नाही. आणि या आर्थिक टंचाईमुळे दर्पण फक्त आठ वर्षे चालू शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी समाजाला वैचारिक मेजवानी देणारी वर्तमानपत्रे फक्त आर्थिक टंचाईमुळे बंद पडली. आताही तेच आर्थिक दुर्बलतेच्या वेदना उराशी बाळगून बहुतांशी वर्तमानपत्र अजूनही सुरू आहेत. म्हणूनच बातमी पेक्षा जाहिरातीसाठी पत्रकार बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते.

आम्ही आमच्या अनेक पत्रकार बांधवांना समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, पुरस्कारांची थैली अगदी शिगोशिग भरलेली असते, परंतु घरात मात्र प्रचंड आर्थिक दारिद्र्य असते. काहींची तर एक वेळ जेवणाची सुद्धा भ्रांत असते. पण पत्रकारिता अंगात इतकी भिनलेली असते की कुटुंबाचे देखील ते पर्वा करीत नाही, आणि त्यांचं कार्य अव्याहतपणे सुरूच असतं. म्हणूनच आम्हीं लेखाच्या सुरवातीलाच म्हटले की, “पत्रकारांच्या ओठांवर स्मितहास्य असते पण काळजात अनेक जखमा आणि वेदना जपत ते पत्रकारिता करत असतात.”

पत्रकारिता क्षेत्रातील अनेक आमचे जिवाभावाचे मित्र आहेत. त्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर, साईमत चे संपादक प्रमोदजी बऱ्हाटे प्रदीप गायके, प्रवीण सपकाळे, शरद कुलकर्णी, राकेश कोल्हे, निलेश वाणी, नरेश बागडे, सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाही. यातील प्रमोद बर्‍हाटे यांनी तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत “साईमत” हे सायंकालीन दैनिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये नावारूपाला आणले. प्रमोदजी बराटे यांच्यासह कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पत्रकारितेचा मानबिंदू टिकवून ठेवणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना आम्ही पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो….!
जय हिंद जय महाराष्ट्र!

पोलीस नाईक, विनोद अहिरे
पोलीस मुख्यालय जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here