भुसावळ विभागातील लसीकरणास आजपासून सुरुवात

0
29

भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. जुना सतारे भागातील वेडीमाता मंदिर परिसरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात सकाळी सुमारे ११.४५ वा.पहिल्या न.पा.आरोग्य विभागातील कर्मचार्‍याला कोविशिल्डची लस देण्यात आली. दरम्यान, सकाळी खा.रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.डॉ.सुनिल नेवे आदींनी आरोग्य केंद्रात येवून भेट देत नियोजनासंदर्भातील माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यात मार्च २०२० ला कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याच्या मोहिमेला अखेर आज सुरुवात झाली. देशपातळीवरील मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात एकाच वेळी ७ ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दररोज शंभरप्रमाणे ७०० आरोग्य कर्मचार्‍यांना प्रत्येकी ०.५ एमएल कोविशील्ड ही प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे. लस घेण्यापूर्वी प्रत्येक लाभार्थीकडून लस टोचण्याबाबत संमतीपत्र भरुन घेतले जात असून त्याचप्रमाणे लसीचे दोन्ही डोस घेवून झाल्यावर संबधित लाभार्थीला लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
भुसावळ येथील नगरपालिकेचे रुग्णालय जुना सतारे भागातील वेडीमाता मंदिर परिसरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात आवश्यक व्यवस्था सज्ज करण्यात आली असून माहिती अद्यायावत करण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास नगरपालिका आरोग्य विभागाचा कर्मचारी रोहिदास शहादू चव्हाण याला सर्वप्रथम लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा डोस आरोग्यसेविका लता लोखंडे यांनी दिला.
यावेळी न.पा.मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवाल, विभागीय पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगिता पांढरे, डॉ.तोसिफ खान, डॉ.आलिया खान, डॉ.संदीप जैन, नगरसेवक प्रमोद नेमाडे, प्रतिभा पाटील, राजकुमार खरात, पोलिस निरिक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस निरिक्षक दिलीप भागवत, तालुका समुह संघटक राजश्री सोनवणे आदींसह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. आजच्या लसीकरणात भुसावळ नगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच तालुका ग्रामीण रुग्णालय, ट्रामा सेंटर, आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here