भुसावळ ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी कोविड-१९ अंतर्गत कार्यरत असणारे भुसावल ग्रामीण रुग्णालयाची कोविड सेवा ३० नोव्हेंबरला संपुष्टात येत असून फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय, विमानतळ जळगाव, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वॉररूम जळगाव फक्त कोविड सेवा सुरू राहणार आहे, असे नमूद केले.
आता यावल, रावेरसह भुसावळ तालुक्यासाठी जळगाव हेच सेन्टर राहील. तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही. ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी तरी ग्रामीण रुग्णालयात क्वॉरंटाईन सेंटर भुसावळ येथे सुरू ठेवावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.नि.तू.पाटील यांनी केली होती. याअनुषंगाने जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी तसे आदेश काढत भुसावळ ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी आणि कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही. ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात क्वॉरंटाईन सेन्टर सुरू ठेवण्याचे कळवले आहे.