जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सतरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
नांद्रा (ता. पाचोरा) येथील सतरा वर्षीय शाळकरी मुलाचा माहेजी येथील गिरणा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. हर्षल संजय तावडे असे मृत मुलाचे नाव असून, रविवारी (ता. २) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. हर्षल काही मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीपात्रात (Girna River) पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. हनुमंतखेडा येथील नावेकरींनी शोध घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. हर्षलने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जळगाव (Jalgaon) येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. शाळकरी मुलांचा अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. हर्षल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. नांद्रा येथील संजय अवचित तावडे यांना दोन मुले होती. हर्षल हा लहान होता. वडिलांचा शेतीचा व्यवसाय, अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला हर्षल अभ्यासात हुशार होता. परंतु, नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी हर्षलचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.