जळगाव ः प्रतिनिधी
संपूर्ण देशात ज्या अभियानाची जय्यत तयारी सुरु आहे, अशा श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाने व्यापक स्वरूप घेतले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सर्वच भागात अभियानाची तयारी पूर्ण झाली आहे. मकरसंक्रांतीचे मुहूर्त साधत श्रीराम नगर वस्ती येथे निधी समर्पण अभिनयान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा निधी अभियान प्रमुख देवेंद्र भावसार, भवानी मंदिराचे पुजारी महेशकुमार त्रिपाठी, श्रीराम मंदिराचे श्रीराम महाराज, कमलाकर बनसोडे, गोविंद सोनवणे, मुकुंदमहाराज धर्माधिकारी व श्रीराम नगर प्रमुख बंटी बाविस्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविकता योगेश दहाड यांनी करत सांगितले कि श्रीराम नगर वस्तीत बळीरामपेठ, शनिपेठ, जुनेगाव परिसरासह एकूण दहा प्रमुख वस्ती येतात. यात अभियानाच्या प्रचारासाठी काल नगर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासह मागील एक महिन्यापासून अभियानाची जय्यत तयारी सुरु आहे. हे अभियान संपूर्ण देशात दि. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या दरम्यान श्रीराम नगर मधील सर्वच वस्त्यांमध्ये निधी संकलनाचे कार्य प्रारंभ होणार आहे. प्रत्येकाच्या मनातील हे मंदिर साकार करण्यासाठी प्रत्येकाचा वाटा यात असावा ही अभिमानाची बाब सर्वांसाठी असणार आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाची हीच भावना आहे की, हे मंदिर राष्ट्र मंदिर आहे, हे मंदिर माझे मंदिर आहे.
कार्यक्रमाचा समारोप श्रीराम नगर प्रमुख बंटी बाविस्कर यांनी केला. यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.