जळगाव : विशेष प्रतिनिधी । येथील मुख्यमंत्री सडक योजनेतील कार्यकारी अभियंत्याची नुकतीच बदली झाली आहे. नेतृत्वहीन कार्यालयाचा भोंगळ कारभार मात्र यामुळे चव्हाट्यावर येतांना दिसून येत आहे. कार्यालयात खुर्च्या रिकाम्या दिसून येतात, जिल्हाभरातील ठेकेदारांची कामे रखडल्याचे दिसत आहे.
प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळुदे हे नाशिकला वास्त्यव्यास असल्याने या कार्यालयाचा कारभार आठवड्यातून एक ते दोन दिवस रेल्वेच्या वेळापत्रकानुसार,सोयीनुसार चालत असल्याने कार्यालयातील शाखा अभियंते,उपविभागीय अभियंते हेदेखील मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. याबाबत वरिष्ठांकडे काही सुज्ञ ठेकेदार तक्रारी करणार असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे .
मुख्यमंत्री सडक योजनेचे जळगाव कार्यलय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने वादग्रस्त राहिले आहे.आता तर अधिकृत कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक नसल्यामुळे या कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येतांना दिसून येत आहे. कार्यालयातील कर्मचारी , शाखा अभियंते,उपविभागीय अभियंते आपल्या मनमर्जीप्रमाणे कामे करीत असल्याने ठेकेदारांना अडचणी निर्माण होत आहेत. प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे ह्यांनी मात्र …हाताची घडी तोंडावर बोट… अशी भूमिका घेतल्याने काही ठेकेदार अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे .