जळगाव : प्रतिनिधी
पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस काल जळगाव शहरात पोहोचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना सोबत घेऊन ही लस ज्या ठिकाणी दिली जाणार आहे त्या जागेची बारकाईने पाहणी केली. पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्यांना ही लस दिली जाणार आहे.
जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर “कोविशील्ड’ लसीची निमिर्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काल संध्याकाळी ६ वाजता पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, आरएमओ डॉ. विजय जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान पठाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत यांनी महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर पहिला त्यात नेत्रकक्ष, अधिष्ठाता कार्यालय परिसर, एआरटी सेंटर, रुग्णालय परिसर, अपघात, ओपीडी विभाग पाहून चर्चा केली. परिसरातील सुशोभीकरण, अद्ययावत वाहन पार्किंग सुविधा, रुग्णालय व्यवस्थापन पाहून समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली. त्यानंतर ओपीडी इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात जाऊन ‘कोविशील्ड’ लस जेथे देण्यात येणार आहे ती जागा निश्चित करून जिल्हा शल्यचिकीत्सक व अधिष्ठाता यांच्याकडून नियोजन जाणून घेतले. पहिल्या दिवशी वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात १०० कर्मचार्यांना या ठिकाणी ‘कोविशील्ड’ लस दिली जाणार आहे. या कर्मचार्यांचा डाटा समोर ठेऊन त्यांना पुन्हा २८ दिवसांनी लसीकरण केले जाणार आहे.
लसीकरणाचा असा असेल पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात ६० टक्के कर्मचार्यांना लसीकरण होईल. ८ जानेवारी रोजी कोवीड लसीकरणाबाबतचा ड्रायरन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रातील १४ हजार कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येणार आहेत. बुधवारी कोविशील्ड लसीचा साठा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली औषधशास्त्र निर्माण विभागाचे अधिकारी सुरेश मराठे यांनी तपासणी करून ताब्यात घेतला.
या केंद्रांवर होईल लसीकरण
एक लस ५ एमएलची असेल. एका कुपीत १० डोस आहेत. शनिवारी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय, जैन रुग्णालय, शिवाजीनगर असे एकूण नऊ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी कळवले आहे.