राळेगणसिद्धी, वृत्तसंस्था । ‘सच की नाव डुबती नही है ।’ देशातील सनदी अधिकाऱ्यांनी ठरवलं हा देश बदलायला वेळ लागणार नाही. कोणत्याही सरकारच्या अधिकारात फक्त बदली करणे आहे आणि अधिकारी बदलीला घाबरतात. अशा वातावरणात चांगले अधिकारी काम करताना दिसतात हा एक आशेचा किरण आहे. हे चित्र पाहिल्याने आपल्याला एक पाऊल पुढं टाकण्याची शक्ती मिळाली आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘जे श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा’ अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांनी केली.
राळेगणसिद्धी येथे सुरु असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हजारे पुढे म्हणाले, या संमेलनाला सांगलीचा एक तरुण, पुण्यातील काही तरुण सायकलने पर्यावरणाचा संदेश देत आले, हे कौतुकास्पद आहे.
स्व.आबासाहेबांचे काम पुढे सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. मागील ३८ वर्षांचा त्यांचा व माझा सहभाग राहिला होता. इथलं चित्र पाहून हा देश उभा राहिलं, असा विश्वास वाटत आहे . लोकांमध्ये विश्वास निर्माण करा , युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे.तिला योग्य दिशा दिल्यास हा देश घडू शकेल. पर्यावरणाची समस्या खूप गंभीर असून तिच्या निराकरणासाठी जे श्रवण केलंय ते अंमलात आणायचा प्रयत्न करा असे अण्णा हजारे म्हणाले.
या प्रसंगी श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत धिवरे, ‘ वी सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने, पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनीही मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी पर्यावरण मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन अण्णा हजारे यांच्याहस्ते करण्यात आले. या वेबसाईटची निर्मिती चिपळूणचे ‘वेब डिझायनर आणि डेव्हलपर’ कुंदन शेट्ये यांनी तर संपादन मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले आहे. दुपारच्या भोजनानंतरच्या सत्रात वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी ‘पाणी व जलव्यवस्थापन’, पक्षीमित्र अनिल माळी यांनी ‘महाराष्ट्रातील पक्षी विविधता आणि अधिवास संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या संमेलनाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. या पर्यावरण संमेलनाला पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सोलापूर, जळगाव, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड, लातूर, सांगली , पालघर , ठाणे येथील प्रतिनिधी उपस्थित आहेत.