जिल्हा क्रिडा अधिकार्‍यांच्या घरी चोरट्यांचा डल्ला

0
26

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील जिल्हा क्रिडा निवासस्थानात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या रोकडसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून एका अधिकार्‍याच्या घरीच चोरट्यांनी डल्ला मारत पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद कॉलनीत जिल्हा क्रिडा अधिकारी सुजाता चव्हाण (वय ५२) यांचे निवासस्थान आहे. काल मंगळवार दुपारी मु.जे. महाविद्यालयात युवा सप्ताह अंतर्गत युवा दिनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. याच सुमारास त्यांच्या निवासस्थानात बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह दोन लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. सुजाता चव्हाण ह्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात क्रिडा अधिकारी पदावर कार्यरत असून त्यांचे पती सेवानिवृत्त आहेत. ते जिल्हा परिषद कॉलनीत माजी जिल्हा परिषद सदस्या उषा बाळासाहेब परखड यांच्या मालकीच्या घरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी युवा सप्ताहनिमित्त मु.जे. महाविद्यालयात युवा दिनी त्या पतीसह सकाळी १०.१५ वाजता घरून निघाल्या होत्या. युवा दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात गेल्या. तेथून त्या सुमारे ३.४५ मिनिटांनी जेवणासाठी घरी आल्या असता त्यांना घराचा दरवाला अर्धवट उघडा दिसला. यावेळी घरातील पंखा सुरूच होता. बेडरूममधील कपाटाचे ड्रॉवर पलंगावर पडलेले दिसले. चव्हाण यांनी घरातील ऐवजांची चाचपणी केली असता त्यांना ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने गायब झालेले दिसले. त्यात ४० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम सोन्याची अंगठी, एक लाख रुपये किमतीच्या १० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची सोन्याची एक नथ, एक हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी असा १ लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, घटनेचे वृत्त पोलीस प्रशासनाकडे करताच घटनास्थळी सहा. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पो.नि. विलास शेंडे, सपोनि महेंद्र वाघमारे, महेंद्र बागुल आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here