रावेर, तालुका प्रतिनिधी । मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात टॅक्सीने आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेऊन तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने केली मात्र रावेर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्याचा भस्मासुर बोकाळला असून अवैध धंद्यावाल्यांनी चहा व पानटपरी सारखी आपली दुकाने थाटली आहेत.
रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे कायदेप्रिय आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गुड बुक मधील ते अधिकारी असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे मात्र अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालून अवैध धंद्यांना चालना देण्याचे कामही त्यांच्या मार्फत होत असल्याने त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंदे व धंदेवाल्यांना कायम स्वरूपी त्यांनी हद्दपार करावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत असतांना अवैध धंदेवाल्यांजवळून त्यांचीच एक टीम दरमहा हफ्ता गोळा करत असल्याची जोरदार चर्चा सुरु असून तसे चित्र समोर येऊ लागले आहे.अवैध धंद्यांचा आता चक्क हेरॉईनसारख्या अमली पदार्थाचा साठाच रावेर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून हस्तगत केल्याने रावेर पोलीस व रावेर शहर यात वाढती गुन्हेगारी व वाढते अवैध धंदे ह्यांचे राज्यस्तरीय केंद्रबिंदू म्हणून रावेर शहराकडे पाहिले जात आहे.या अवैध धंद्याबाबतीत जिल्हा अधीक्षक प्रवीण मुंढे ह्यांनी तातडीने व गोपनीय पद्धतीने लक्ष देऊन अवैध धंद्यांचा कायम स्वरूपी न्यायमोड करावा अशी अपेक्षा रावेर वासियांकडून केली जात आहे .