यावल, प्रतिनिधी | पिंपरूड फाट्याजवळ वाहने अडवून रस्तालूट करणार्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जण फरार झाले आहे.
आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केले असून दोघे मात्र फरार झाले आहेत. दि. २१ रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फैजपूर पोलिसांचे पथक पहाटे गस्तीवर असताना पिंपरूळ फाट्यावर तीन तरुण वाहने अडवून वाहनचालकांना मारहाण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यात मंगेश भाट, (आंदलवाडी, ता. रावेर) यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक ४३/ई- ७४४८ या वाहनाला थांबवून चालक यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील २०० रुपये घेतले.
या वाहनाच्या काचासुद्धा दगडफेक करून फोडल्या तसेच उमेश चौखंडे (रा. रुईखेडा, जि. अकोला) यांच्या ताब्यातील वाहनालासुद्धा अडवून चौखंडे यांच्या खिशातून ६०० रुपये व दोन मोबाईल आरोपींनी हिसकावले. यावेळी पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एक आरोपी कपिल विजय खंडेराव याला पकडण्यात यश आले. फरार आरोपींची नावे जॅकी फ्रान्सिस, हेमंत तायडे अशी आहेत. या आरोपींच्या ताब्यातून ४०० रुपये रोख व २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, फौजदार मकसूद शेख, पोलीस कॉन्स्टेबल किरण चाटे, बाळू भोई यांच्या पथकाने केली.
आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर न्यायालयात हजर केले असता कपील विजय खंडेराव याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.