शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या कामास गती द्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

0
48

जळगाव : प्रतिनिधी
शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करावे,जेणेकरुन महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जळगाव शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) किरण सावंत पाटील, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, उपअभियंता स्वाती भिरुड यांचेसह एसटी, वीज वितरण कंपनी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील जुन्या लाईन व पोल तातडीने काढून घ्यावेत. त्याचबरोबर महानगरपालिकेने महामार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ महापालिकेच्या घंटागाड्या घनकचरा संकलनासाठी रस्त्यावर उभ्या असतात ते इतरत्र हलवावे. त्याचबरोबर महामार्गावर स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी नगरोत्थान अथवा जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळणेबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तातडीने सादर करावा. अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते, महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तुंची विक्री करतात त्यामुळेही वाहतुक कोंडी होवून रस्ताच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलीस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भूसंपादनाची गरज असेल तेथे भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल याबाबत नियोजन करण्याच्या सूचनांही दिल्यात.
तसेच महामार्गावर अपघात होवू नये याकरीता वाहनचालकांसाठी आवश्यक त्या सुचना महामार्ग विभागाने ठिकठिकाणी लावाव्यात.
नागरीकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्या
महापालिकेमार्फत शहरातील रस्त्यांची कामे करतांना अमृत योजना, पाणीपुरवठा व मल:निस्सारणाची कामे करतांना रस्ते खोदतांना नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.शक्यतो दोन्ही कामे एकाचवेळी होतील याबाबत नियोजन करावे. त्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती करावी. रस्ते दुरुस्ती अथवा नवीन रस्ता
बनविल्यानंतर रस्ते खोदू नये.रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात.
वाहनचालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे
जिल्ह्यात यावर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या काळात राबविण्यात येणार आहे. या अभियानात परिवहन विभाग, एसटी महामंडळ, पोलीस विभाग विभागाने वाहनचालकांच्या समुपदेशानासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. वाहतुक नियमांची प्रचार व प्रसिध्दी करावी. वारंवार होणार्‍या अपघाताची ठिकाणे निश्चित करुन तेथे सुरक्षेचे उपाय योजावेत. वाहनचालकांची आरोग्य तपासणी,डोळे तपासणीसारखे उपक्रम राबवावेत. वळण रस्तांवर रिप्लेक्टर लावावे, वाहनांची गती राखण्याबाबतचे चिन्हे लावातील. त्याचबरोबर नागरीकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. बेफिकिरपणे वाहन चालवून इतरांना त्रास होणार नाही याबाबत नागरीकांनी काळजी घ्यावी, दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here