जळगाव : प्रतिनिधी
प्रत्येक व्यक्तीने उत्साह व जिद्द ठेवली तर तो आयुष्यात कुठल्याही अडचणींचा सामना सहज करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर प्रवीण धीमन यांनी केले.
जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांच्या पालकांचा सत्कार बुधवारी नूतन मराठा महाविद्यालयात करण्यात आला. या वेळी चाळीसगावचे शहीद जवान यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट राहुल पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविकात एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी महाविद्यालयातील एनएसएस युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. लेफ्टनंट राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. पल्लवी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी आभार मानले. या वेळी कॅप्टन कमल पाटील, लेफ्टनंट योगेश बोरसे, प्रा.डॉ.राहुल संदनशिव आदी उपस्थित होते.
दुर्गादास गायकवाड (जीडी जनरल ड्यूटी,गोवा), राहुल पाटील (जीडी जनरल ड्यूटी, मराठा ली, बेळगाव), दिनेश पाटील (जीडी जनरल ड्यूटी, मराठा ली, बेळगाव), जयेश पाटील (बेळगाव किर्की, पुणे), आकाश शर्मा (कोंबॅक्ट अविशन, नाशिक), तेजस जाधव (आर्टिलरी एनआरसी १७० नाशिक), लेफ्टनंट राहुल पाटील यांची निवड अधिकारी रँकला झाली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व चाचण्या पार करून त्यांची निवड अलाहाबाद सेंटरमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण चेन्नईतील प्रशिक्षण अकादमीत झाले. २१ नोव्हेंबरला प्रशिक्षण पूर्ण झाल्याने ते आता इंफंट्री १/३ गोरखा रेजिमेंट येथे रुजू होणार आहे.