जळगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे सात दिवसीय धरणे आंदोलनाला कालपासून प्रारंभ झाला आहे.आज या आंदोलनात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. काल सोमवारी या आंदोलनात पदाधिकार्यांसह जळगाव व जामनेर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले.
केंद्र सरकारने ३ कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यामुळे भारतातील शेतकरी व शेती व्यवसाय संकटात येणार आहे. शेतकर्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समिती व हमीभाव धोक्यात आले आहेत. हे तिनही अध्यादेश रद्द होण्याच्या मागणीसाठी शेतकरी सिंघू, गाजीपूर सीमेवर आंदोलन करीत आहेत. शेतकरी विरोधी कायदे रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सात दिवस चालणार्या या धरणे आंदोलनात प्रत्येक तालुक्यातील शेतकरी सहभागी होत आहेत. आज मंगळवारी बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्यांनी सहभाग घेतला.या वेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, विश्वासराव पाटील, सिताराम सोनवणे, राहुल सपकाळे, सुनिल देहडे, वाय. एस. महाजन, गणी इसाक शहा, सैतुल्ला शेख, इरफान शेख, अरुण मोरे, फईम पटेल उपस्थित होते.