जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन वर्षानंतर महापालिकेत ऑफलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. दलित वस्ती निधीवरून यावेळी खडाजंगी होऊन उपमहापौर कुलभूषण पाटील व स्वीकृत नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे जळगावच्या विकासाच्या व नागरिकांच्या हिताच्या रस्ते,गटारी,आरोग्य, शिक्षण वगैरे बाबत नागरिक हे सुख सोयींपासून वंचित असताना अशा प्रकारची वादावादी दांगडो करून जळगाव शहराचे नाव हे मलीन करण्यात भर पडली आहे. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना मध्येच दांगडो होऊन त्यात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचे दिसून आले. त्यातच राष्ट्रद्रोह केल्यामुळे तरुण मुले-मुली देश,राष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांवर याचे वाईट पडसाद पडून राष्ट्रहितावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर घटनेची सीसीटीव्ही फुटेज वरून सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनावर महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, महानगर उपाध्यक्ष तुषार भोई, महानगर उपाध्यक्ष अनिल लोंढे आदींच्या सह्या आहेत.