जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवेचा लाभ घेणार्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.प्रवाशांची संख्या जुलै २०२०च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात तब्बल सहापटीने वाढली आहे.उडान-२ या योजनेंतर्गत सप्टेंबर २०१९ ला सुरू झालेल्या विमानसेवेचा आतापर्यंत सुमारे २१ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे विमानसेवेच्या नकाशावर जळगाव शहराचा बिंदू अधिक ठसठशीत होण्याकडे जळगाव विमानतळाची वाटचाल सुरू असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांमध्ये व्यक्त केली जात आहे.
शासनाच्या उडान-२ योजनेंतर्गत जळगावातून अहमदाबाद व मुंबई या दोन शहरांना अनुक्रमे आठवड्यातून सहा व पाच दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली होती. ती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडीच ते तीन महिने बंद ठेवल्यानंतर पुन्हा सप्टेंबर २०२०मध्ये सुरू झाली. अहमदाबादसाठी आठवड्यातून तीन दिवस व मुंबईसाठी केवळ एक दिवस सेवा सुरू आहे. जुलैत जेव्हा विमानसेवा बंद करण्यात आली तेव्हा त्या महिन्यात अवघ्या १६४ प्रवाशांनी जळगावातून विमानाने प्रवास केला होता. डिसेंबर महिन्यात विमानसेवेचा लाभ घेणार्यांच्या संख्येने हजाराचा टप्पा पार केला आहे. कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे बहुतांश जण लांब पल्ल्याचा प्रवास करणे टाळत आहे. कोरोना निवारण झाल्यावर प्रवासी पटीने वाढतील.
कोरोना काळात घेतली काळजी
कोरोना काळ सध्या सुरू आहे. अजूनही पूर्णत: त्याचा धोका टळलेला नाही. म्हणून विमानतळावर अधिक सतर्कता बाळगली जाते आहे. आता हळूहळू विमानाने प्रवास करणार्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र गेल्या महिन्याभरापासून समोर आले असून ते दिलासा देणारे आहे, असे म्हणावे लागेल.