जळगाव : प्रतिनिधी
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार आहे.या लसीकरणानंतरही नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, महानगरपालिकेचे शिवाजीनगर येथील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र,धामणगाव,ता.जळगाव येथे ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देवून ड्राय रनचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
वैद्यकीय महाविद्यालयात ड्राय रन
कोविड १९ लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन आज पार पडला. पालकमंत्री ना. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांना ड्राय रनच्या पूर्व तयारीची माहिती देण्यात आली. आरोग्य यंत्रणेने केलेली तयारी बघून पालकमंत्री ना. पाटील यांनी समाधान व्यक्त केले व यंत्रणेचे कौतुक केले. आरोग्य कर्मचारी मिलिंद निवृत्ती काळे यांना पहिली, तर राकेश अरुण पाटील यांच्यावर लसीकरणाची दुसरी चाचणी करण्यात आली. यावेळी अधिपरिचारक संपत मल्हार यांनी त्यांची संगणकावर नोंद केल्यावर परिचारिका कुमुद जवंजाळ यांनी मिलिंद काळे व राकेश पाटील यांना प्रातिनिधिक लस टोचली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले. पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते मिलिंद काळे व राकेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सिंग कॉलेज इमारतीची रचना, पाहणी करून समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. संदीप सूर्यवंशी, अधिसेविका कविता नेतकर, परिचारिका जयश्री वानखेडे, कर्मचारी अनिल बागलाणे आदींनी परिश्रम घेतले.