जळगाव ः प्रतिनिधी
सध्याच्या जगात आपण सोशल मीडिया वापरला नाही तर आपल्याला कुठलेही अद्ययावत माहिती मिळणार नाही व आपण जगाच्या मागे पडू,अशी भीती वाटू लागते. अर्थात, त्यातून नकळत आपले सोशल मीडियावरील अवलंबत्व वाढते आहे, असे प्रतिपादन मुक्ता चैतन्य यांनी केले.
दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या “माझा स्क्रीन माझी जबाबदारी’ या शेवटच्या सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या स्क्रीनच्या वापरामुळे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. वेळ, ऊर्जा आणि बुध्दी यांचा योग्य वापर न करता तासनतास आपण स्क्रीन चाचपडत राहतो. भावनिक दृष्टीकोनात तुम्ही सोशल मिडीयाचा वापर करीत असाल तर तुम्हाला त्यातून नैराश्य येऊ शकते. याचाच परिणाम कुटुंबातील संवाद अगदी कमी होऊन तो फक्त सोशल मीडियाच्या वापरातून केला जातो. त्यामुळे गरजेपुरता वापर, स्क्रीन वापराबाबत योग्य ज्ञान व पद्धती ठरवणे आवश्यकतेनुसार तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे मत मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओरिसा येथील आयएएस राजेश पाटील व अॅड.ओम त्रिवेदी उपस्थित होते. सूत्रसंचालन यजुर्वेंद्र महाजन यांनी केले. डॉ. नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचा समारोप करत आभार मानले.