जळगाव ः प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथील २४ वर्षीय महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या गर्भाशयाच्या नलिकेत गर्भ राहून तो फुटल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तत्काळ उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले.
बर्याच दिवसांपासून पोटदुखी
जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात जांभूळगाव येथील २४ वर्षीय विवाहितेला २ मुले आहेत. कुटुंब मजुरी करते. त्यावरच उदरनिर्वाह करतात. पहूर व जामनेर येथे उपचार न झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बर्याच दिवसांपासून महिलेच्या पोटात दुखत होते. सोनोग्राफीतदेखील काही निदान होत नव्हते.
डॉ.बनसोडेंकडून तपासणी
अखेर ३० डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाल्यावर स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी तपासले. महिलेच्या अंगात रक्त कमी होते. पोटात रक्त जमा झाले होते. गर्भनलिकेत गर्भ राहून फुटल्याचे निदान त्यांनी केले. त्यामुळे महिला गंभीर झाली होती. सीटी स्कॅन करण्यात वेळ न घालवता खंबीर राहिले व त्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
त्यांनी शस्त्रक्रिया करून पोटात जमा झालेले सुमारे दीड लिटर रक्त बाहेर काढले. फुटलेला गर्भ व गर्भनलिका शस्त्रक्रियेने काढण्यात आल्या. तसेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काल ७ जानेवारी रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. संजय बनसोडे यांना डॉ. अश्विनी घैसास, डॉ. प्रदीप पुंड, डॉ. शीतल ताटे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, अधिपरिचारिका नीला जोशी यांनी सहकार्य केले.