साईमत नाशिक प्रतिनिधी
गंभीर गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या तसेच मागील दोन महिन्यांपासून पोलिसांच्या शोधात असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने सापळा रचून अटक केली. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश मनोज जोंधळे (वय ३४, रा. रामदास स्वामीनगर, तारा निवास, टाकळी रोड, नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात सिद्धेश जोंधळे हा संशयित आरोपी होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. त्यानंतर तो विविध ठिकाणी लपून राहत असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
दरम्यान, आरोपी सिद्धेश जोंधळे हा ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात नियोजनपूर्वक सापळा रचला.
गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, मनोज परदेशी आणि पोलीस अंमलदार अतुल पाटील यांच्या पथकाने पाथर्डी फाटा परिसरात कारवाई करत सिद्धेश जोंधळे याला ताब्यात घेतले.
आरोपीला पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे. फरार आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
