जळगावातील शनिपेठ परिसरातील इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

0
44

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ येथील एक जुनी इमारत आज सकाळच्या सुमारास कोसळली. यात सात जण बचावले व इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका वृद्धेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली एक जुनी इमारत गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जळगावातील शनीपेठेत असलेल्या कै.गंगुबाई यादव शाळेसमोर एका इमारतीच्या बांधकामासाठी खोल खड्डा खोदण्यात आला आहे. बांधकामधीन इमारतीच्या शेजारी असलेली घरे लोडबेरिंग पद्धतीचे असल्याने त्यांना देखील धोका निर्माण झाला होता. गुरुवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. इमारतीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धेला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी ४ वाजेच्या सुमारास इमारतीची माती पडायला सुरुवात झाल्याने नातू रोहित पाटील याला जाग आली.

प्रसंगावधान राखत त्याने लागलीच कुटुंबीय रमेश पाटील, शोभा पाटील यांच्यासह दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणी सोनाली पाटील, गायत्री पाटील व एक ५ वर्षीय चिमुकली यांना बाहेर काढले. सर्व जिन्यावर येताच इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या खालील खोलीत कलाबाई पाटील वय-७५ या वृद्धा राहत होत्या. वरील मजल्यावरील सर्वांना बाहेर काढल्यानंतर आजीला बाहेर काढण्याच्या आतच इमारत कोसळली. हाडांना आणि छातीला मार लागल्याने वृद्धा हालचाल करू शकत नव्हत्या. परिसरातील तरुण कृणाल महाजन, रज्जाक सैय्यद, रोहित पाटील, इम्रान खान, वाहिद खान, वसीम खान, शाहिद खान यांच्यासह मनपा अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी, कर्मचारी संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, प्रदीप धनगर, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, रवींद्र बोरसे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, नासिर शौकत अली, नितीन बारी आदींनी बचावकार्यात सहभाग घेत वृद्धेची सुखरूप सुटका केली. घरातील सोने, वस्तू, दागिन्यांसह दुचाकी आणि खालील गोडावूनमध्ये असलेले सर्व साहित्य ढिगाऱ्यात दाबले गेले आहे. घरातील दोन गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here