मुंबई, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानातील सत्तापालटानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुकामेव्याचे दर वाढले होते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशातील घाऊक बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. दिवाळीच्या सणाला सुकामेव्याला प्रचंड मागणी असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.
सुकामेव्याचा नवा दर
बदामाचा भाव 1100 रुपयांवरून 680 रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव 1120 रुपयांवरून 660 रुपयांवर घसरला आहे.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव 1140 रुपयांवरून 680 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अफगाणिस्तानच्या बदामाची किंमत 1190 रुपयांवरून 600-700 रुपये किलोवर आली आहे. त्याचबरोबर काजूचा भाव 1000 रुपयांवरून 800 रुपये किलोवर आला आहे. अक्रोडचे दर 1000 रुपये किलोवरून 800 रुपये किलोवर आले आहेत.
काजू-बदामाचे दर आणखी घसरणार?
बदामाचे उत्पादन झाल्यानंतर ते बराच काळ ओले असतात आणि त्यात तेलाचे प्रमाण जास्त असते आणि नंतर ते सुकते. जे बदाम सुकवले जातात, त्यातून तेल काढले जाते. हे प्रत्येक बदामाच्या दर्जावर अवलंबून असते. भारतात प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून बदामांची आयात होते. जे दर्जेदार असतात आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्याने ते खूप महागडे विकले जातात. याशिवाय ममरा कर्नल बदाम इराणमधून येतात. ते थोडे स्वस्त आणि लवकर सुकतात. याशिवाय कॅलिफोर्नियाचे बदामही येतात, ते त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. दिवाळीनंतर हिवाळ्यात बदामाचे नवीन उत्पादन येते. सुरुवातीच्या काळात ते खूप महाग असतात. बदाम सुकल्यानंतर हे दर खाली येतात.