मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येत आहे. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ७४४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, याच एका दिवसात ४० रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ६४ लाख ३२ हजार १३८ वर पोहोचला आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.४६ टक्के इतका झाला आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ९९ हजार ८५० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्या जरी नियंत्रणात येत असली तरीही निश्चितच मृत्यूंचा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे, हळूहळू राज्यातील लोकांचं जनजीवन सुरळीत होतं असलं तरीही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे, नागरिकांनी खबरदारी घेणं आणि जबाबदारीने वागणं अत्यंत आवश्यक आहे.
