जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना घरपट्टीत ५० टक्के सूटसह गाळेधारकांना बंद काळातील करात माफीचा ठराव पालिका प्रशासनाने विखंडनासाठी पाठवला आहे. शहरात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नसल्याने तसेच गाळे रिकामे नसल्याने ठरावाची अंमलबजावणी करता येणार नाही.त्यामुळे प्रशासनाने सत्ताधारी भाजपने केलेला ठराव रद्दसाठी पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल ते जून महिन्यापर्यंत व्यापार व्यवसाय बंद होता. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता करात करदात्यांना ५० टक्के माफी द्यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने थेट प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केल्यामुळे सत्ताधार्यांची गोची झाली होती.
अखेर महासभेत या विषयावर चर्चा करून राज्य शासनाकडे अनुदान मागण्याचा ठराव करण्यात आला होता.
नियमानुसार ठराव अशक्य
मालमत्ता करा ५० टक्के सूट देण्याचा ठराव केला आहे; परंतु शहरात कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवलेली नाही. कलम १३३ नुसार ठरावाची अंमलबजावणी अशक्य आहे. कारण कराची आकारणी ही मालमत्तेवर आहे. आपत्ती असली तरी मालमत्तेला धोका पोहोचलेला नाही. याशिवाय गाळेधारकांच्या मागणीनुसार सूट देता येणार नाही. कारण कलम ५६ नुसार अंमलबजावणी करायची झाल्यास दुकाने पूर्ण रिकामे असावेत. तसेच त्यात व्यवसाय सुरू नको; परंतु प्रत्यक्षात दुकाने बंद असली तरी त्यात व्यवसाय सुरू आहे. दुकानांचा ताबादेखील दुकानदारांकडेच आहे. अशा परिस्थितीत दोन्ही ठरावांची अंमलबजावणी अशक्य असल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी तसेच १५ दिवसांपूर्वी दोन्ही ठराव विखंडनासाठी राज्य शासनाकडे पाठवले आहेत. त्यामुळे शासन आता काय निर्णय देते याकडे लक्ष लागून आहे.
मालमत्ता कर वसुलीवर कोरोना संसर्गाचा परिणाम
शहरातील मालमत्ताधारकांचा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा भरणा कमी आहे. मागची थकबाकी व चालू वर्षातील कराची वसुली केवळ ४० टक्के आहे. थकबाकीतील अनेक रकमा ह्या वादग्रस्त आहेत. यात मोबाइल टॉवर, भूखंड कर वसुली, मोठ्या मालमत्तांसंदर्भात न्यायालयातील दावे ही प्रमुख कारणे आहेत. चालू वर्षातील मागणीनुसार ५० टक्केपेक्षा जास्त वसुली झाली आहे. पालिका प्रशासन चालू वर्षी वसुलीवर अधिक भर देत आहे. कारण कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी झाली असून, त्याचा परिणाम वसुलीवर झाल्याचे स्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे.