मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंदाकिनी खडसे यांना मंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
सत्र न्यायालयाने याआधी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांना अटक होण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत होती. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान घेत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मंदाकिनी खडसेंच्या या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.
न्यायालयाने मंदाकिनी खडसेंच्या अटकेला तुर्तास स्थगिती देत त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदाकिनी खडसेंना 17 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवार आणि शुक्रवार ईडीसमोर हजर रहावे लागणार असून 21 ऑक्टोबरला मंदाकिनी खडसेंना विशेष न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासोबतच भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंना अंतरीम दिलासा दिला आहे. ईडीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मंदाकिनी खडसेंची सूटका करण्यात येणार आहे.