मुंबई, प्रतिनिधी । राज्यातील सर्व अकृषी , अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी केली.
सामंत म्हणाले की, ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत ते विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. तसेच विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेदेखील लसीकरण प्राधान्याने व्हायला हवे.
वर्ग पूर्णपणे की ५० टक्के क्षमतेने सुरू करावेत, कोविडचा स्थानिक प्रादुर्भाव व परिस्थिती, प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन, पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचारविनिमय करून योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
पूर्वीच्या सूचना लागू
{ राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
{ ज्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना.
{ वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.