जळगाव, प्रतिनिधी । कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेतंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वार्डासह गल्ली, प्रभागात सर्वसामान्य नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ लाख २८ हजार १३४ पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात १९ लाख ३ हजार १८७ नागरिकांना पहिला तर ६ लाख २४ हजार ८६४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणास पात्र लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील जवळपास
70 टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ पासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास आली. त्यानंतर ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर २१ जूनपासून जिल्ह्यातील १८ वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरीकांकडून स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद दिला जात आहे. कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहेत. या लसीकरण केंद्रामार्फत आतापर्यंत शहरी भागातील १० लाख ३९ हजार ९८४ लाभार्थ्यांना तर ग्रामीण भागातील १४ लाख ८८ हजार १५० लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यात १९ लाख ३ हजार १८७ जणांना पहिला डोस तर ६ लाख २४ हजार ९४७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील ४ लाख ४८ हजार १६६ पेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणात सहभाग नोंदवला आहे.
तालुकानिहाय झालेले लसीकरण
जळगाव-५३२८६७, भुसावळ-२५२८०७, अमळनेर-१६४५७५, चोपडा-१७०५३१, पाचोरा-१६४७४८, भडगाव-९५८२०, धरणगाव-९६१०३, यावल-१४०२६४, एरंडोल-९४५६२, जामनेर-१८१७६३, रावेर-१६४३३८, पारोळा-१०४४०६, चाळीसगाव-२३५४३४, मुक्ताईनगर-८४१०३, बोदवड-४५८१३ असे एकूण २५ लाख २८ हजार १३४ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
मिशन कवच कुंडल मोहिमेत नागरिकांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी
सद्य:स्थितीत संसर्ग साखळी खंडीत होत असली तरी आगामी सण, उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसर्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा वाढविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून दर आठवड्यात पुरेश्या प्रमाणात लसीचा मात्रा जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. कुठेही लसीची कमतरता नाही. लसीच्या उपलब्धतेनुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर 1 ते 3 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही किंवा लसीचा पहिला डोस घेउन विहित कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा नागरिकांनी मिशन कवच कुंडल मोहिमेत आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन स्वयंस्फूर्तीने लसीकरणात सहभाग नोंदवावा. सद्यस्थितीत लसीकरणाला आलेली गती पाहता नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यत पात्र नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी संसर्ग प्रादूर्भाव टाळण्यासाठी लसीचे दोन डोस घेतले असले तरी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहेत.