रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं, त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
11

रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं, त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी)-

आम्ही राजकीय पक्ष फोडतो तसे तुम्ही शाळा चालविण्यासाठी विद्यार्थी फोडा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्यामागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावणार का, असा प्रश्न केला होता. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर रोहित पवार हे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं आहे. त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते, असा प्रश्न केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. रोहित पवार म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं पोरगं असून, माझे पूर्ण भाषण त्याने ऐकलेले नाही. तो अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे, अशी एकेरी भाषा त्यांनी आमदार पवार यांच्याविषयी वापरली.

जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुकास्तरावरील विजेत्या शाळांना शनिवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या ४५ हजार विद्यार्थी आहेत, त्यामध्ये अलिकडच्या काळात वाढ झालेली नाही. अनेक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशी चिंता व्यक्त करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थी पळवून पटसंख्या वाढविण्याची नामी युक्ती सांगितली होती. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून आपण विनोदाने बोलून गेल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, मंत्री पाटील यांच्या त्या वक्तव्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत टीकेची झोड विरोधी पक्षांनी उठवली.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारावी. त्यामुळे शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनीही गद्दारीची आणि फोडाफाडीची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावू नये, असा टोला मंत्री पाटील यांना हाणला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here