बांभोरी गिरणा नदीवर ट्रॅक्टर नादुरुस्त
महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
उभी बुलेट पेटली; नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
जळगाव (प्रतिनिधी)-
बांभोरी येथील गिरणा नदीवरील ऐन पुलावर खडीने भरलेला ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्याने दुपारी महामार्ग जाम झाला होता. याच वेळी पुलावर उभ्या असलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला मात्र या वेळी तेथील नागरिकांनी माती टाकून ती आग आटोक्यात आणली.
आज दुपारी तीन वाजेच्यासुमारास खडी घेऊन जाणारे ट्रॅक्टर अचानक नेमके पुलावरच नादुरुस्त झाले. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला महामार्ग जाम झाला होता. जळगावहून येणारी वाहतूक मानराजपर्यंत तर जळगांवला जाणारी वाहतूक पाळधी वळण रस्त्यापर्यंत खोळंबली होती. यात अनेक चाकरमान्यांचे उन्हाच्या तीव्रतेने हाल झाले. दुपारी नोकरीनिमित्त जाणारे व शाळेतून घरी येणारे विद्यार्थी यांचेही अतोनात हाल झाले बऱ्याच नागरिकांनी प्रवास टाळला.
याचवेळी पुलावर उभ्या असलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला त्या बुलेटच्या टाकीवर बालक बसले होते अशी चर्चा आहे. नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बुलेटवर माती फेकून आज विझविली. त्यामुळे अनर्थ टळला अशी चर्चा होती.
महामार्ग तब्बल पाच तास जाम झाला होता. यावेळी जळगांव शहर वाहतूक, तालुका पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरू केली मात्र ट्रॅक्टरची खडी पुलावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.