रस्त्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने
जळगाव (प्रतिनिधी)-
शहरातील दुर्वांकुर पार्क ते गुड्डूराजा नगर, पिंप्राळा रोडपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी संतप्त नागरिकांनी आज महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद न साधता केबिनमध्ये निघून गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आणि तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
या परिसरातील रहिवासी ३५ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला तोंड देत आहेत. ते नियमित कर भरत असले तरी अद्याप योग्य रस्ता मिळालेला नाही. कच्च्या रस्त्यामुळे धूळ, चिखल आणि अपघातांची समस्या निर्माण झाली आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारही नसल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकवेळा तक्रारी करूनही कामे न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला.
संतप्त नागरिकांनी प्रशासनाला सांगितले की, तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही, तर आगामी काळात महापालिकेचे कुठलेही कर भरणार नाहीत. आता तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. नागरिकांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा संताप वाढला.



