मुंबई, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे भाव कडाडल्यानंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे तर डिझेलचा भाव 35 पैशांनी वाढला आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 109.55 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 99.60 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 103.54 आणि 92.12 रुपये इतका आहे.
कच्च्या तेलाचे तर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.