जिल्हा रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांसह नर्सिंग स्टॉफला धक्काबुक्की
जळगाव ( प्रतिनिधी) –
हल्ल्यात जखमी तरुणावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कॉलर पकडून त्याच्या नातेवाईक व इतरांनी धक्काबुक्की केली . हीघटना शुक्रवारी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली. सात जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या भांडणातून ७ मार्च रोजी रात्री काट्याफाईल भागात राहुल शिंदेला मारहाण करून त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
तेथे मध्यरात्री उपचार सुरू असताना जखमीसोबत आलेले नातेवाईक व मित्रांपैकी काही जण खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याविषयी तर काही जण लवकर उपचार करा, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. एक जण मोबाईलमध्ये शुटींग करीत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनयकुमार यांनी विचारणा केली असता पाच ते सहा जण डॉक्टर व नर्सिंग स्टॉफच्या अंगावर धावून आले धक्काबुक्की केली. एकाने डॉ. अभिनयकुमार यांची कॉलर पकडली.
गोंधळ वाढून जखमीचे नातेवाईक व मित्र ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. डॉ. अमोल पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यापैकी रवींद्र शिंदे (३०, रा. चौघुले प्लॉट) व सुमीत महाजन (२४, रा. शिवाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पोउनि उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.