नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार

0
7

 

नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात
विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार

नाशिक (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात विवाह पूर्व संवाद केंद्राच्या माध्यमातून नियोजित वधु-वरांचे समुपदेशन होणार असून, विचार व मतांच्या आदान-प्रदानातून कौटूंबिक नाती अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करीत प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

महिला दिनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपक्रमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर येथे ‘तेरे मेरे सपने’ विवाह पूर्व संवाद केंद्र उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते.

यावेळी महिला व बाल विकास उपायुक्त चंद्रशेखर पगारे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या समन्वयक कविता जुनेजा, विवाह ठरलेली जोडपी यांच्यासह अधिकारी व महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांंनी राष्ट्रीय महिला आयोगांमार्फत ९ राज्यात २२ ठिकाणी विवाह पूर्व संवाद केंद्र जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सूरू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत याच धर्तीवर तालुकास्तरावर असे विवाह पूर्व संवाद केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.

या केंद्रात येणारे नियोजित वधु- वरांना समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत समुपदेशकांना दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. जोडप्यांना त्यांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, न्यायिक अधिकार, विवाहानंतरचे आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, त्यांच्या एकामेकांबद्दलच्या अपेक्षाही येथे जाणून घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, जालना, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सांगोला, सोलापूर व नागपूर या १० ठिकाणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांनाही विवाह पूर्व संवाद केंद्राचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन सुविधेद्वारेही समुदेशन सुविधा नाशिक केद्रात उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here