जळगाव, प्रतिनिधी । सोमवारी मध्यरात्रीपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून धरणांचा साठा वाढला आहे. बोरी धरणाचे १२ दरवाजे उघडून मंगळवारी विसर्ग करण्यात आला.
सध्या बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटर असून, मंगळवारी दुपारी १ वाजता धरणाचे १२ दरवाजे .०१५ मीटरने उघडून ५४१२ क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारपर्यंत तालुक्यात ९०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बहादरपूर, शिरसोदे, महालपूर या गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावर पाणी वाहत असल्याने मंगळवारी या गावांचा संपर्क तुटला होता. परिणामी या परिसरातील नागरिकांना दळवेल, मुकटीमार्गे पारोळा येथे यावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, भाजीपालादेखील महागला आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला जावा, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचून, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
