जळगाव ः प्रतिनिधी
वास्तूविशारद दिवाकर देव यांच्या प्रथमस्मृती दिनानिमित्त महाबळ परिसरातील हतनूर हॉल येथे त्यांच्या अप्रकाशित ‘अबोध अवकाश’ या ९९ कविता संग्रहांचे प्रकाशन व निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
काव्यसंग्रहाचे प्रकाशन लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जनता बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रा.शरच्चंद्र छापेकर व मकरंद देशमुख उपस्थित होते.
व्यवसायाने वास्तुविशारद असताना विटा, सिमेंट यासोबत अफाट निरीक्षण, संवेदनशीलता दिवाकर देव यांनी आपल्या भावविश्वातील अबोध विचार काव्यबद्ध व चित्रातून मांडली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते; पण ‘अबोध’ होते, असे विचार विविध वक्त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन देव यांच्या ज्येष्ठ भगिनी मधुवंती देशमुख व मेहुणे मकरंद देशमुख यांनी केले होते. या वेळी दिवाकर यांचे निकटचे मित्र परिवारांची उपस्थिती होती. या वेळी प्रकाशक अनील शिंपी, सहकार्यांचे प्रतिनिधी म्हणून खलील सैय्यद, चित्रप्रदर्शनासाठी सहकार्य करणारे तरुण भाटे आदींचा सत्कार करण्यात आला. रेणुका जोशी यांनी ‘आजोळी’, ‘आजीची हाक’, ‘संन्याशी’ या कवितांचे वाचन केले. या वेळी देव यांचे बालमित्र, व्यावसायिक परिचित यांच्या व्हिडीओ संदेश दाखवले.
यात पंकज गोहिल, जपान, निशा जगताप, राहुल मुठे, उप जिल्हाधिकारी, पूणे, महाराष्ट्र बँकेचे निवृत्त अधिकारी वसंत म्हस्के यांचे संदेश दाखविण्यात आले. काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिलेले प्रा. शरच्चंद्र छापेकर,भरत अमळकर, प्राचार्य अनिल राव, संजय दहाड व देव यांची भगिनी मधुवंती देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. कल्पना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका जोशी यांनी आभार मानले.