मुंबई, दि. 21 : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ या परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. येथील प्रदर्शन दालनांचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विदेश व्यापार महानिदेशालयाचे (DGFT) अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी निर्यात परिषदेचे अध्यक्ष संजय शाह, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित होते.
