जळगाव ः प्रतिनिधी
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला,भाजपसारख्या कपटी मित्रांकडून आपल्याला मिळालेली वागणूक सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत एवढी वर्षे आपले राजकीय शत्रू राहिलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुळवून घेत भाजपला गावातच रोखण्याची वेळ आली आहे. आगामी सर्व निवडणुकीत यापुढे महाविकास आघाडीचा पॅटर्न राहणार आहे.त्यामुळे एक पाऊल मागे घेऊन दिलदारपणा दाखवा आणि ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आणा, असे आवाहन शिवसेना नेत्यांनी जिल्हा बैठकीत केले.
सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचा मेळावा सरदार वल्लभभाई पटेल लेवाभवन येथे आयोजित केला होता. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत,आमदार चिमणराव पाटील,आ.किशोर पाटील, लताबाई सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होतेे.
ग्रामपंचायत ही राजकीय निवडणूक नाही. गावात सर्वच भावकीचे, नातेवाईक असतात. निवडणुकीमुळे कुुटुंबात भावकीत निर्माण झालेले वाद हे दीर्घकाळ मिटत नाहीत. त्यामुळे गावात निवडणूक होऊन पक्षाची सत्ता येण्यापेक्षा गाव तंटामुक्त असावे, तेथील कार्यकर्ते विकासाच्या मार्गावर चालावेत म्हणून आमचे पहिले प्राधान्य निवडणूक बिनविरोध करण्यास आहे. अशा गावांसाठी आम्ही शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी जास्तीचा निधीही जाहीर केलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. शक्य तेथे बिनविरोध, काही ठिकाणी पक्षाचे तर जेथे शक्य नसेल अशा ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचा प्रयत्न करा. ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि पुढे लोकसभा मतदारसंघातील खासदार देखील महाविकास आघाडीचा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या वेळी म्हणाले.
वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढल्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी जुळवून घेताना कार्यकर्त्यांना निश्चितच अडचणी येणार आहेत; परंतू भाजपला दूर ठेवण्यासाठी आपल्याला ते करावेच लागेल. कपटी भाजपपेक्षा आघाडीतील दोन्ही नवीन मित्र दिलदार आहेत. त्यांच्याशी जुळवून घ्या, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.
राज्यातील सत्तेचा गावाच्या विकासासाठी पुरेपुर उपयोग करून घ्या. गावात वाद होणार नाहीत यासाठी निवडणूक बिनविरोध केलेली केव्हाही चांगली आहे. निवडणुकीचे वाद हे गावाला विकासापासून दूर ठेवतात आणि वैयक्तिक वादही
वाढतात. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहान ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी केले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांनी आपल्या तालुक्यातील निवडणुकीचा आढावा सादर केला. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविक केले. विश्वनाथ पाटील यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.
आपणही दिलदारपणा दाखवा
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेससोबत जुळवून घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. आपणही भाजपला दूर ठेवण्यासाठी आघाडीतील दोन्ही पक्षांशी जुळवून घेण्यासाठी एक पाऊल मागे हटण्याची तयारी ठेवावी. भविष्यातील सर्वच निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे.तिनही पक्षांची ताकत एकत्रित आल्याने ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता असेल. या निवडणुकीत थेट मुंबईतून पक्ष पहिल्यांदा ताकत देत असल्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत या वेळी म्हणाले.