मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा दहशतवादी जान मोहम्मद अली शेख याच्या अटकेवरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एकूण ६ जणांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली असून त्यात जान मोहम्मदचा देखील समावेश आहे.
जान मोहम्मद धारावीत राहत असूनही राज्यातील तपास यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का? असा सवाल करत विरोधकांनी टीका केली असताना आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे.
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी झाकिरला ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळून लावत एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याच प्रकरणात झाकिरला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयामध्ये मध्यरात्रीपासूनच हालचाल दिसू लागली होती. रात्री २ च्या सुमारास एटीएसचे वरीष्ठ अधिकारी देखील कार्यालयाबाहेर दिसून आले, तेव्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले. अखेर, रात्री ३ च्या सुमारास महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, यासंदर्भातली टिप दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडूनच आल्याची देखील माहिती मिळत आहे.