पुणे, वृत्तसंस्था । ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन (६४) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. प्रा. पद्मनाभन हे पुण्यातील आयुका या संस्थेत मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), केंब्रिज येथील खगोलशास्त्र संस्था व पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) या संस्थांमधून त्यांनी चार दशकांहून अधिक काळ संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. या विषयांमधील मूलभूत योगदानासाठी जगभर ते ओळखले जात. भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विषयांतील त्यांचे सुमारे ३०० रिसर्च पेपर नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. पद्मनाभन यांनी लिहिलेल्या क्रमिक आणि तांत्रिक पुस्तकांचा समावेश जगभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये झाला आहे.