नऊ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे – पालकमंत्री

0
19

जळगाव प्रतिनिधी । शहरातील महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या नऊ रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सदरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी तातडीने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे होईल असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

जळगाव शहर महानगरपालिकेला प्रदान केलेल्या 61 कोटी रुपयांच्या कामांची सद्यस्थिती आणि उर्वरित कामांच्या नियोजनाबरोबरच शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याबाबत येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर जयश्रीताई महाजन, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अधिक्षक अभियंता रुपा गाजरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक नितीन लढ्ढा, विषणू भंगाळे, शरद तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या चौकांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुशोभीकरण करावे त्याचबरोबर इतर चौकांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत. आजच्या बैठकीत शहरासह जळगाव तालुक्यातील विविध विकासकामांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजनेतून महानगरपालिकेच्या दिलेल्या 61 कोटी रूपयांच्या विनियोगाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. निमखेडी ते शिवाजीनगर, टॉवर चौक ते आसोदा रेल्वे गेट, शिवाजीनगर पूल ते के. सी. पार्क, भिलपुरा पोलीस चौकी ते ममुराबाद (मनपा हद्दीपर्यत) टॉवर चौक ते काव्य रत्नावली चौक, टॉवर चौक ते अजिंठा चौफुली, कोंबडी बाजार ते डीमार्ट (मोहाडी फाटा), मोहाडी फाटा ते लांडोरखोरी आणि काव्य रत्नावली चौक ते गिरणा पंपींग हे प्रमुख रस्ते महापालिकेने सार्वजनीक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी त्यावरीत अतिक्रमण काढून द्यावे तसेच त्याकरीता लागणारे ना हरकत प्रमाणपत्रही तातडीने देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथील चौकांचे सुशोभीकरण करावे तर बहिणाबाई चौक, रिंगरोड चौक, टॉवर चौक, स्वातंत्र्य चौक आणि अन्य चौकांच्या सुशोभिकरणासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावेत यासाठी नगरविकास विभागाकडून निधी मिळविणसाठी आपण प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या 440 कोटी रुपयांच्या तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत सुरु असलेलया 35 कोटी रुपयांच्या कामांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यात आसोदा येथील उड्डाणपुल, प्रिंपाळा- भोईटेनगर पुल, म्हसावद येथील उड्डाणपुल, खेडी-भोकर पुल, मोहाडी येथील 100 खाटांचे रुग्णालय आदिंचा समावेश आहे. मोहाडी येथील अद्ययावत अशा 100 खाटांच्या महिला रूग्णालयातील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी अर्पण करण्याच्याद्ष्टीने संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.

या बैठकीत जळगाव-ममुराबाद-विदगाव-धानोरा राज्यमार्ग, पाळधी-फुफनगरी-ममुराबाद-आसोदा-तरसोद-नशिराबाद-मन्यारखेडा-कुसुंबा-मोहाडी-सावखेडा-पाळधी हा रिंग रोड, नशिराबाद-सुनसगाव-कुर्‍हा-बोदवड (जिल्हा हद्द) या राज्य महामार्गाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांचे विकासाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here