कर्ज काढून देण्याच्या नावाखाली तरूणासह इतरांची पाच लाखात फसवणूक

0
35

जळगाव प्रतिनिधी । टाटा फायनान्स लिमिटेड कंपनीत नोकरी देण्यासह कंपनीकडुन कर्ज देण्याचे आमिष दाखवत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील तरूणासह इतरांची ५ लाख २३ हजार ८१० रुपयांत फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार १६ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपळगाव हरेश्वर येथे गोविंदपुरा येथे जीवन कैलास बोढरे वय २७ हा तरुण राहतो. त्याचे सलूनचे दुकान असून त्यावर उदरनिर्वाह भागवतो. १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान जीवन यास वेगवेगळ्या नावाने अज्ञात इसमांनी संपर्क साधला. टाटा फायनान्स लिमीटेड या कंपनीतून बोलत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे जीवन याचा संबंधितांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर जीवन यास कंपनीत नोकरी दिली असल्याचे सांगत त्याला व इतरांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार जीवन सह इतरांचे कागदपत्रही त्यांनी मागविले. संबंधितांनी लोन मंजूर झाल्याबाबतचे बनावट कागदपत्रे पाठवली. तसेच लोन मिळण्यासाठी प्रोसेसिंग फी, डिक्लेरेशन चार्जेस, जीएसटी, स्टॅम्प फी, एनईएफटी चार्ज व बँक फी अशा वेगवेगळ्या कारणांवरून जीवन व इतरांकडून ऑनलाईन ५ लाख २३ हजार ८१० रुपये स्विकारले. कुणालाही कर्ज न मिळाल्याने संबंधित फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर जीवन बोढरे या तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here