जळगाव ः प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दोन दिवसीय ६६ वे राष्ट्रीय अधिवेशनास काल रेशीमबाग, नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, अभाविप राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.छगनभाई पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. कोविड-१९ च्या सूचना नुसार अधिवेशनास जे कार्यकर्ते उपस्थित राहू शकले नाहीत अशा कार्यकर्त्यांकरीता ऑनलाईन पद्धतीने अधिवेशनास सहभागी होण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
अभाविप जळगाव महानगराच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात शारदाश्रम शाळा येथे अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, शारदाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका चैतना नन्नवरे, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, महानगरमंत्री आदेश पाटील यांच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रितेश चौधरी यांनी केले. यावेळी युवकांनी महाविद्यालय दशेत असतांना आपल्या कला गुणांना चालना देण्यासाठी व व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी विद्यार्थी परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे मत चैतना नन्नवरे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सेवाकार्याची माहिती व ऑनलाईन माध्यमातून ४ हजार स्थानांवरून दीड लाख विद्यार्थी सहभागी होत आहेत व कोरोना काळात परिषद कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवाकार्याची माहिती अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी दिली. परिषद की पाठशाला या उपक्रमाच्या माध्यमातून परिणाम स्वरूप बालकांवर होत असलेल्या संस्कारांबाबत कौतुक केल्या गेले. या संकटाच्या काळात महाविद्यालये बंद असल्यावरही ऑनलाईन माध्यमातून अभाविप सदस्य नोंदणीला आलेला उस्फुर्त प्रतिसाद व परिषदेच्या वाढत्या विस्ताराबाबतची मांडणी राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी दिली.गौरवशाली भारत व युवक याबाबत सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.