जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गातील वाहनसेवा अचानक ठप्प

0
18

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी ४५ वाहनांची वाहन सेवा गेल्या पंधरा दिवसापासून अचानक थांबली असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी व शालेय आरोग्य तपासणीचे कामकाज पूर्णतः बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित, नाशिक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी २२ डिसेंबर रोजी पत्र काढून सेवा सुरु करण्याबाबत निर्देश दिले व अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यातील ४६ पथकांचे काम थांबलं
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण ४६ आरबीएसके पथके कार्यरत केले आहे. ४६ पैकी ४५ पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे. सदर वाहने ही १४ डिसेंबर पासून उपलब्ध झालेली नाही.यामुळे आरोग्य तपासणी करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील ४६ पथकांचे काम थांबले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांचे पत्र
कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्ह्यातील ४५ वाहनांची सेवा खंडित केली यामुळे राष्ट्रीय कार्यात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ठेवत कंत्राटदार संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवाभावी संस्था मर्यादित नाशिक यांना थेट पत्र काढले असून पत्रात अंगणवाडी व इयत्ता ९ ते १२ पर्यंत शाळा सुरु झालेली आहे.सदर अंगणवाडी व शाळा आरोग्य तपासणी करणे तसेच कोविड कामकाजाकरिता वाहनांची आवश्यकता आहे.
वाहने बंद असल्याने आरोग्य तपासणी करण्यास अडचणी येत आहे यामुळे राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे, हे अत्यंत खेदजनक बाब आहे.तात्काळ वाहने सुरु करुन तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे म्हटले आहे.
काय आहे योजना
राज्यातील सर्व जिल्हयांत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी राज्यात ११३० पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात २ वैद्यकीय अधिकारी (१ पुरुष व १ स्त्री ), १ आरोग्य सेविका व १ औषध निर्माता यांचा समावेश आहे. तालुकास्तरावरील ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये येथे या पथकांचे मुख्यालय करण्यात आले आहे.
सध्या या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विदयार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सदर पथकांना मुलांची तपासणी करण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे व औषधे यांची किट देण्यात आलेली आहे. पथकामार्फत तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना संदर्भसेवा ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये येथे दिल्या जातात.या पथकांना फिरण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत वाहन सेवा पुरविण्यात येते यामुळे पथकांना खेडोपाडी जाऊन आरोग्य तपासण्या करण्यास मदत होते.
कंत्राटदार संस्थेवर कारवाई अपेक्षित
अत्यावश्यक असणारी सेवा वाहन सेवा अचानक पूर्वसूचना न देता बंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून कोरोनासारख्या महामारीत वाहन सेवा बंद केल्याने कंत्राटदार संस्थेने शासनासोबत केलेला करार भंग केला असून अशा संस्थांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here