भुसावळ ः प्रतिनिधी
मनोरंजन वाहिन्यांचं मायाजाल, समाजमाध्यमांचा वाढता वापर अशा नानाविध कारणांनी कुटुंबातील संवाद हरवला. ज्या घरात ज्येष्ठांचं वास्तव्य नाही ती घरे मुकी बनतात. अभिव्यक्त होण्यांची प्रक्रीया थांबते. संवाद होत नसल्याने साचलपेपणा वाढतो. कालांतराने कौटुंबिक तणाव वाढत जातो. अव्यक्त मने व्यक्त झाली तर ताणतणावावर मात करता येते, असे परखड मत वाशिमच्या लेखिका उज्ज्वला सुधीर मोरे यांनी व्यक्त केले.
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय पुष्पांजली ऑनलाइन प्रबोधनमाला घेण्यात आली. त्यात शनिवारी अंतिम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ‘मुकी घरे बोलकी करू या’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. संकटाच्या काळात, ताणतणावाच्या परिस्थितीत एकमेकांना धीर असायचा. हल्ली मात्र, कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. नात्यांतील दुरावा वाढत चालला आहे. घरात सकाळ-सायंकाळ एकत्र चर्चा करणं थांबलं आहे. दिवस-दिवसभर मुलांचा पालकांशी, पालकांचा मुलांशी संवाद होत नाही. दुरावणारी नाती जोडण्यासाठी दिवसभरात किमान तीन ते चार वेळा पालकांचा मुलांशी भावनिक संवाद झाला पाहिजे. अर्थात, मुले-मुली आणि पालकात मैत्रीचं नातं प्रस्थापित झालं पाहिजे. एकत्र राहणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची काळजी घेणारं कुटुंब म्हणजे सुखी कुटुंब म्हणता येईल, अशा भावनभावना त्यांनी व्यक्त केल्या. सुत्रसंचालन प्रदीप सोनवणे यांनी केले. जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे या सांस्कृतिक उपक्रमासाठी पाठबळ मिळाले. भालोदचे अमोल हरिभाऊ जावळे,समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य प्रा.डॉ.उमेश वाणी, रोटरीचे सुधाकर सनांसे, मुंबईच्या स्टेपअप इंडियाच्या यती राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.प्रकल्पप्रमुख अमित चौधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. सोनवणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वैश्विक कल्याणाची भावना ठेवा
स्वत:पुरतं जगणं म्हणजे जगणं नाही. वैश्विक कल्याणाच्या उद्देशाने काम करत राहण्याची शिकवण मुलांना दिली पाहिजेे. समाजात वावरताना दु:खाने पिचलेल्या माणसाला पाहून दु:खी होणं म्हणजे संवेदना जागरूक आहेत असं समजायला हवे. वाद हा वाळवीसारखा असतो. संपूर्ण घर तो पोखरून काढतो. ही वाळवी वाढू नये म्हणून संवाद हीच त्यावर खरी मात्रा आहे. संवादाच्या वेलीला सुसंवादाची पालवी फुटू द्या, असेही उज्ज्वला मोरे व्याख्यानात म्हणाल्या.