मेलबोर्न : वृत्तसंस्था
भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने इतिहास रचत मोठी कामगिरी केली आहे. त्याने अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत मोठा अपसेट केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. अलेक्झांडरचे या स्पर्धेत वे३१ मानांकन होते. त्याचा पराभव करत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सुमित नागल २०१३ नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. सोमदेव देवबर्मनने २०१३ मध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. १९८९ नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी सामन्यात अग्रमानांकित खेळाडूचा पराभव केला आहे. रमेश कृष्णन यांनी १९८९ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांनी स्वीडनच्या मॅट्स विलँडरचा पराभव केला. विलँडर त्यावेळी टेनिस क्रमवारीत जगातील अव्वल खेळाडू होते.सुमितने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची मुख्य फेरी जिंकली आहे. याआधी २०२०च्या यू.एस. ओपनमध्ये तो मुख्य ड्रॉमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. टेनिस क्रमवारीत अव्वल १०० मध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला त्याने सातव्यांदा पराभूत केले आहे.



