मुंबई : प्रतिनिधी
भाजपाचे (BJP) नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे.’ असे म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दरेकरांवर टीका करताना ‘…राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतो’ अशी धमकीवजा प्रतिक्रिया दिली होती. याच्या उत्तरात प्रवीण दरेकर म्हणालेत, “गाल सर्वांनाच रंगवता येतात.” अशी जुगलबंदी रंगली आहे.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रवीण दरेकर म्हणाले होते. ‘“राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरिबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.”
यावर रूपाली चाकणकर म्हणाल्यात, ‘आपल्या बोलण्यातून दिसणारं वैचारिक दारिद्र्य संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी; अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतो.”
याच्या उत्तरात दरेकर म्हणालेत, “मी कुणाच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देत नाही. कारण, अशा वक्तव्यांमुळेच त्यांना थोडीफार प्रसिद्धी मिळते. पण गाल सर्वांनाच रंगवता येतात. कोणी अतिरेकी भाषा करू नये.”
