नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीच्या मैदानावर होणार आहे.या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाने देखील आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.
जर आपण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर या मैदानावर आतापर्यंत ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले आहेत. या कालावधीत लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २११ धावा केल्या होत्या. भारताने सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०८ धावा केल्या होत्या. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. विराट कोहलीने ३ सामन्यात १५६ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने या मैदानावर चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टी फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमधील
बलाबल कसे आहे?
टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ५ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चार सामने भारताने जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. अफगाणिस्तानच्या संघाने अद्याप भारताविरुद्ध एकही टी-२० सामना जिंकलेला नाही. टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने पहिला सामना २०१०मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला होता.
विराटने सर्वाधिक धावा केल्या
अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ३ सामन्यात १७२ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत अफगाणिस्तानविरुद्ध एका सामन्यात भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघासाठी ही
मालिका महत्त्वाची आहे
टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वी भारताची ही शेवटची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आहे.अशा स्थितीत भारतीय संघाला खेळाडूंची चाचपणी करून संघ बांधणीसाठी करण्याची ही शेवटची संधी आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या दुखापतींमुळे या मालिकेत भाग घेणे कठीण दिसत आहे.