मुंबई : प्रतिनिधी
आमदार अपात्रतेबाबत ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे पूर्ण झाली असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. १० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय सुनावण्याची मुदत आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. ज्यांच्याकडून निकालाची अपेक्षा आहे त्यांनी ज्यांच्यावर सुनावणी सुरू आहे त्यांची भेट घेणे हे संशयास्पद आहे असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटले की, ज्यांच्यापुढे प्रकरण आहे आणि ज्यांची केस आहे. ती केस मांडणे चुकीचे नाही. परंतु ज्यांच्यासमोर केस मांडली आहे आणि ज्यांच्याकडून निकाल अपेक्षित आहे. त्यांनी ज्यांची केस आहे, त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते. हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती असे त्यांनी म्हटले.
हा खटला वैयक्तिक नसून देशात यापुढे लोकशाही राहणार आहे की नाही. हे दोघे मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत हे उद्याच्या निर्णयावरून कळेल. मी मुख्यमंत्री होतो. कधीही विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाही तर अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना बोलावून घेऊ शकतात. परंतु हे दोघे फक्त मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष नाहीत. एक न्यायाधीश आहे तर दुसरे आरोपी आहेत. मग न्यायाधीश ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना भेटू शकतात का? यातून संशय येतो की या दोघांची मिलीभगत तर नाही ना..असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
दरम्यान, आम्ही सुप्रीम कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट झाली हे सांगितले आहे. जनतेच्या कोर्टात आम्ही जात आहोत, जनतेचा अधिकार कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. मागील २ वर्षापासून हा खटला चालत आहे. काहीही आवश्यकता नव्हती. सरळ सरळ यात सर्वकाही स्पष्ट आहे. घटनातज्ज्ञांची प्रतिक्रिया जनतेने पाहावी. इतका वेळ यात वाया गेला. बेकायदेशीर सरकारच्या हातात राज्याचे भवितव्य असणं हे धोक्याचे आहे. उद्या काय होणार याबाबत निकालातून दिसेल असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
निकालाबाबत लढवले जात आहेत तर्कवितर्क
राहुल नार्वेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा निकाल देण्यास उशीर झाला आहे, असे वाटत नाही. जवळपास ३४ याचिकांवर सुनावणी सुरू होती. त्यानंतर सुमारे सव्वा दोन लाख पानांची छाननी करायची होती. त्यामुळे निकाल देण्यास एवढा उशीर लागणारच होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांवर ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले. आता राहुल नार्वेकर यांच्याकडून उद्या सुनावण्यात येणाऱ्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार का? की सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप अवैध ठरवला जाणार आणि दोन्ही गटांमधील कुणीही अपात्र ठरणार नाही, असे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सरकारला कोणताही धोका नाही : फडणवीस
राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार कालही स्थिर होते आज आणि उद्यादेखील स्थिर असल्याचा दावा भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला. मला एवढीच अपेक्षा आहे की, योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील. आम्ही शिवसेनेसोबत अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार तयार केले आहे. आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे, अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल. यामुळे कुठलाच धोका नाही,सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.