नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वर्षभर 20-20 आंतरराष्ट्रीय सामन्यापासून दूर राहिलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानविरुद्ध संघात दिलेली संधी संघ निवडीनंतर चोवीस तासाच्या आत कळीचा मुद्दा ठरत आहे.
एकदिवसीय सामन्यात निर्णायक सामन्यात आलेले अपयश आणि तोपर्यंत या दोन प्रमुख फलंदाजांनी दाखवलेला सूर आणि दोघांचेही निवृत्तीच्या वाटेवर असलेले वय लक्षात घेता दोघांनाही ट्व्ोन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी एक अखेरची संधी द्यावी अशा मागणीने जोर धरला होता. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू विश्वचषक स्पर्धेसाठी तयार आहेत असे त्यांच्याकडून अजून समोर आलेले नाही.
अशा वेळी निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत जाऊन अनेक खलबते करून या दोघांबरोबर प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मन वळवल्याचे बोलले जात आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेेच्या गेल्या दोन सत्रांत भारताच्या हाती काहीच लागलेले नाही. अशा वेळी एक शेवटची संधी म्हणून या दोघांवर विश्वास टाकण्याचे निवड समितीने धाडस केले असावे असा एक मतप्रवाह पुढे येत आहे. त्याच वेळी या दोघांची निवड विश्वचषक स्पर्धेतील आणखी एक संधी वाया दवडली जाणार असा दुसरा मतप्रवाह पुढे येत आहे. अर्थात, या सगळ्याला काळच उत्तर ठरणार आहे.
समावेशावरून दोन
मतप्रवाह कशामुळे ?
रोहित आणि विराट यांचा ट्व्ोन्टी-२० क्रिकेटमधील अलीकडचा स्ट्राइक रेट खूप कमी आहे. तुलनेत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांची कामगिरी सरस ठरते. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. या दोघांच्या निवडीमुळे यशस्वी आणि ऋतुराज या गुणी फलंदाजांच्या निवडीवर मर्यादा येऊ शकतात.
चर्चेसाठी हे ठरले निमित्त
निवड समितीने विश्वचषक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवूनच अफगाणिस्तानविरुद्धची संघ निवड केली असे मानले जाते. त्यामुळेच रोहित आणि विराट यांना खेळण्याचा सराव व्हावा म्हणून अफगाणिस्तानविरुद्ध या दोघांना निवडण्यात आले. हे दोन्ही खेळाडू २०२२च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाल्यास त्यांना सराव मिळेल असा निवड समितीचा मानस असावा.
दोघांच्या समावेशामुळे
विजेतेपदाची खात्री कशी?
रोहित आणि विराट या दोघांना अफगाणिस्तानविरुद्ध मिळालेली संधी ही विश्वचषक खेळणार असल्याचे संकेत मानले जात आहेत. पण, ही निवड नेमकी कशासाठी हे निवड समिती सांगू शकलेली नाही. अर्थात, अफगाणिस्तानविरुद्ध संधी देताना ते विश्वचषकात खेळतील असे स्पष्ट विधानही केलेले नाही. या दोघांचा समावेश भारताला विजेतेपद मिळवून देण्याची खात्री देते का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित राहतो. संधी मिळालीच तर उत्तरासाठी पाच महिने थांबावे लागेल.
