मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. निवडणुकीच्या आधी १५ ते २० दिवसांत मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील असे मोठे विधान महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की,…आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार आहेत. त्यावेळी आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या १५ ते २० दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील.
शरद पवारांकडे
पक्ष शिल्लक नाही
यावेळी बोलतांना गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. “शरद पवारांनी एक-दोन जणांना निवडून आणून दाखवावे. शरद पवारांकडे पक्ष शिल्लक राहिलेला नाही. शरद पवारांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची चिंता करावी,” असा खोचक सल्ला महाजनांनी दिला आहे.
तर शिंदेंना मोठा धक्का
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या १० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार आहे तर मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने हा निकाल लागला तर विद्यमान सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या प्रकरणाआधी गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
